इंदापूर – पाणथळ दलदलीच्या ठिकाणी हमखास आढळणारी ‘पाणकणीस ‘ पाणवनस्पती आता हद्दपार होऊ लागले असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तळ्याच्या काठावर, ओढे-नाले, दलदलीच्या ठिकाणी, नदीच्या किनारी पाणथळ ठिकाणी हमखास आढळणार्या पाणकणसांच्या पानांचा उपयोग जुन्या काळापासून आजपर्यंत कच्च्या घरांच्या छप्पराला शेकारण्यासाठी केला जात होता. मात्र, आता सिमेंट, पत्र्याच्या जमान्यात पाला- पाचोळा वापरून केलेली छप्पराची घरेही कमी झाली आहेत. तीस- चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागामध्ये पाणकणीसांच्या पेंढ्या व गव्हाच्या पीकाच्या काडाने शेकारलेली अनेक घरे दिसून येत होती. मात्र, आता झपाट्याने नागरीकरण होत असल्याने अशी घरे बांधणारा वर्ग ही मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला आहे.
गावोगावच्या शिवारात कोणत्याही पानथळ ठिकाणी आणायासे उपलब्ध होणारी पानकणीस पाणवनस्पती अनेकांच्या घरावर छप्परासाठी मोठा आधार होती. उन्हाळ्यामध्ये अत्यंत थंड वातावरण करणाऱ्या छप्परामध्ये शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, शेतमजुरांनी वर्षानुवर्ष श्रमपरिहार केला. नागवेलीच्या मळ्यामध्ये नागवेलीचे झाड पांगरा अथवा शेवरीच्या झाडाच्या आधाराने उंच नेहण्याकरता शेतकरी पानमाळ्यामध्ये पानकणसांच्या पाल्याचाच वापर करून वेलाची झाडाला बांधणी करीत असत. मात्र आता सहजासहजी कुठेही पाणकणीस दिसत नसल्यामुळे शेतकरी पाणमळ्यामध्ये अन्य साधनांचा उपयोग करू लागले आहेत. असे हे निसर्ग संरचनेतील बहुउपयोगी पाणकणीस आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पाणकणीस ही टायफेसी कुळातील एकदलीय वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव टायफा अँग्युस्टिफोलिया आहे. गवतासारखी दिसणारी व बहुवर्षायू असून दख्खन पठारावरील पाणथळ जागा (वेटलँड) कमी झाल्यामुळे किंवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्यामुळे ही बहुपयोगी पाणवनस्पती तिच्या नैसर्गिक अधिवासातून हळूहळू हद्दपार होत आहे.
शेतकरी आणि स्थानिक लोकांकडून पाणकणसाच्या खोडाचा व पानांचा वापर चटया, दोर, टोपल्या, चाळणी आणि छप्पर तयार करण्यासाठी पूर्वी मोठ्याप्रमाणात केला जात असे. पिकलेल्या कणसातील मऊ भाग जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास मदत होते. झाडांची मुळे नदी व तळ्याकाठची जमीन एकत्र धरून ठेवतात आणि जमिनीची धूप थांबवितात. पाणथळ पक्षी, उभयचर प्राणी आणि इतर जलचरांचा निवारा आणि लपनक्षेत्र म्हणून ही वनस्पती अतंत्य महत्वाची आहे. ह्या वनस्पतीचे लोकोपयोगी महत्व व पर्यावरणीय मूल्य लक्षात घेता तिचा नैसर्गिक अधिवास जतन आणि संवर्धित करणे ही समाज आणि शासन ह्या दोघांची नैतिक जबाबदारी आहे. – डॉ. सचिन अनिल पुणेकर, पर्यावरण शास्त्रज्ञ आणि संस्थापक अध्यक्ष- बायोस्फिअर्स