पुणे विमानतळावर वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेले बहुमजली वाहनतळ शुक्रवारपासून (२५ नोव्हेंबर) कार्यान्वित करण्यात येणार आहे. चारचाकी आणि दुचाकीही उभ्या करण्याची सुविधा या सशुल्क वाहनतळात असणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी या वाहनतळाच्या इमारतीचे (एरोमॉल) उद्घाटन करण्यात येणार आहे.
हेही वाचा- मध्य प्रदेश, गुजरातमध्ये शेतमजुरी कमी; केरळमध्ये सर्वाधिक सव्वासातशे रुपये मजुरी
पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी याबाबतची माहिती दिली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २०२० साली पेबल्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लि. च्या सहयोगाने ४ लाख ५० हजार चौरस फूट जागेमध्ये वाहनतळाचा हा प्रकल्प उभारला आहे. १२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पाच मजली इमारतीत सुमारे एक हजार चारचाकी आणि दुचाकींच्या पार्किंगची सोय असणार आहे. केवळ वाहनतळच नव्हे, तर प्रवाशांसाठी विविध दालने, फुडकोर्ट अशा सुविधाही तेथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विमानांच्या उड्डाणांचे स्थिती फलकही इमारतींच्या सर्व मजल्यांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांच्या वेळा समजण्यास मदत होणार आहे. प्रवासी व अन्य नागरिकांकरिता वाहनतळाची इमारत २४ तास सुरू राहील. दुसऱ्या मजल्यावर छोट्या आणि तातडीच्या व्यावसायिक बैठकांसाठी सशुल्क जागा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा- राज्यात तापमानात वाढ, थंडी घटली
वाहनतळाची वैशिष्ट्ये आणि सुविधा
- वाहनधारकांना घरबसल्याही मोबाइलवरून वाहनतळातील जागा निवडणे आणि त्याचे आरक्षण करता येणार आहे. त्यासाठी मोबाइल ॲप महिनाभरात सुरू केले जाईल.
- वाहततळावरील विविध सुविधांसाठी फास्टस्टॅग, क्रेडिट कार्ड, पे ऑन फूट, मोबाइल ॲपव्दारे पैसे भरता येतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचू शकेल. तसेच ‘फाइंड माय कार’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली मोटार कोणत्या मजल्यावर आहे, हे समजू शकेल.
- प्रवाशांना लिफ्ट, पादचारी उड्डाणपूल, स्वयंचलित जिन्यांची सुविधा आहेत. मात्र, त्यासोबतच वृद्धांसाठी पर्यावरणपूरक गोल्फ कार्टची (कार) व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.
- प्रवाशांना सोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या चालकांना विश्रांतीसाठी येथे खास विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे.
- वाहनतळाच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट विमानतळावरील टर्मिनल क्रमांक एक जवळील पहिल्या क्रमांकाच्या प्रवेशद्वारावर येता येईल.
- इमारतीच्या छतावर सौरऊर्जेचे पॅनेल बसविण्यात आले असून, त्यातून निर्माण होणाऱ्या ग्रीन एनर्जीचा वापर इमारतीसाठी होणार आहे.