मेंदू आणि मज्जारज्जूच्या ‘मल्टिपल स्लेरॉसिस’ या आजाराचे रुग्ण पुण्यातही आढळत असून प्रत्येक मज्जाविकार तज्ज्ञाकडे दर महिन्याला या आजाराचे किमान १ ते २ रुग्ण उपचारांसाठी जात असल्याची माहिती मज्जाविकारजत्ज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांनी दिली. देशात हा आजार दर एक लाख लोकसंख्येमागे तीन रुग्ण या प्रमाणात आढळू लागला असून वेळेवर निदान आणि नियमित उपचार यामुळे रुग्णांचे जीवनमान सुसह्य़ होऊ शकते, असेही कुलकर्णी म्हणाले.
स्नायूंवरील नियंत्रण जाणे, शरीराचा तोल सांभाळता न येणे, जीभ जड होणे, दृष्टी अधू होणे, एकच वस्तू दोन- दोन दिसणे, हातापायांना मुंग्या किंवा बधिरपणा येणे, हातापायांत अशक्तपणा येणे, स्मरणशक्ती कमी होणे अशी लक्षणे मल्टिपल स्लेरॉसिसमध्ये दिसू शकतात. २८ मे हा दिवस ‘मल्टिपल स्लेरॉसिस दिवस’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत या आजाराविषयी माहिती दिली.
ते म्हणाले, ‘‘मल्टिपल स्लेरॉसिसमुळे मेंदू आणि मज्जारज्जूवर परिणाम होतो. त्यामुळे स्नायूंवरील नियंत्रण जाणे, शरीराचा तोल सांभाळला न जाणे अशी लक्षणे दिसू शकतात. तसेच दृष्टी आणि स्पर्श संवेदनांवरही  विपरीत परिणाम होऊ शकतो. या आजारात मेंदू आणि मज्जारज्जूच्या नव्र्हज्चे नुकसान होते. हा आजार का होतो याचे नेमके कारण ज्ञात नाही. परंतु आनुवंशिकता, काही पर्यावरणीय घटक किंवा विशिष्ट विषाणूची कमी वयातच लागण होणे, या गोष्टी कारणीभूत ठरत असाव्यात असा अंदाज काही अभ्यासांमध्ये मांडण्यात आला आहे. हा आजार २० ते ४० या वयोगटात अधिक प्रमाणात आढळतो. त्यातही ६० टक्के रुग्ण स्त्रिया असतात.’’  
या आजाराचे निदान एमआरआय तसेच रक्ताच्या विविध चाचण्यांद्वारे होत असून काही रुग्णांना ठराविक वर्षांसाठी तर काहींना आयुष्यभर उपचार घ्यावे लागत असल्याचेही कुलकर्णी म्हणाले.