लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: राज्यात पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि गोव्यात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज असून, यंदाच्या मोसमात आतापर्यंत केवळ मुंबई शहर आणि पालघर जिल्ह्यातच सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
यंदा प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाल्याने त्याचा पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतरही पावसाला जोर असल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, लातूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण पाऊस पडला आहे, तर उर्वरित बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. कमी पावसामुळे शेतकरीही चिंतेत आहेत.
आणखी वाचा-पुण्यातील जुन्या वाड्यांना मिळणार नवे रूप!
दरम्यान, दक्षिण गुजरात किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पुढील दोन दिवसांत आकाश ढगाळ राहण्याची, हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.