पुणे : जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची असलेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२५ मध्ये राज्यातील चार संस्थांनी पहिल्या एक हजार संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यात आयआयटी मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाने गेल्यावर्षीच्या कामगिरीत सुधारणा करत स्थान उंचावले आहे. क्वॅकेरली सायमंड्सतर्फे ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. नियोक्ता प्रतिष्ठा, शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, रोजगार परिणाम, शाश्वतता, आंतरराष्ट्रीय संशोधन अशा निकषांवर उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा, मोसमी पावसाची गोव्यात अल्पविश्रांती

जागतिक स्तरावर मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने पहिले स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या स्थानी लंडनचे इम्पिरियल कॉलेज, तिसऱ्या स्थानी ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे. देशातील आयआयटी मुंबई आणि आयआयटी दिल्ली या दोन उच्च शिक्षण संस्थांनी या यादीतील पहिल्या दीडशे संस्थांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. २०२४ च्या क्रमवारीत १४९ व्या स्थानी असलेल्या आयआयटी मुंबईने आता ११८ वे स्थान मिळवले आहे. आयआयटी दिल्ली १५० व्या स्थानी आहे. बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) २११ व्या, आयआयटी मद्रास २२७ व्या, आयआयटी कानपूर २६३ व्या, दिल्ली विद्यापीठ ३२८ व्या स्थानी आहे. राज्यातील आयआयटी मुंबईसह एकूण चार संस्थांनी या यादीत स्थान प्राप्त केले. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. २०२४ मध्ये ७११ ते ७२० या गटात असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ६३१ ते ६४० या गटात स्थान मिळवले. त्या खालोखाल सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाने ६४१ ते ६५० या गटात स्थान प्राप्त केले. गेल्यावर्षी ७५१ ते ७६० या गटात असलेल्या मुंबई विद्यापीठानेही कामगिरी उंचावत यंदा ७११ ते ७२० या गटात जागा मिळवली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai iit secured 118 rank in qs world university rankings 2025 pune print news ccp 14 zws
Show comments