मुंबईमध्ये लोकल गाडय़ांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात पुण्याच्या लष्कर भागात राहणाऱ्या सोहेल शेख याला विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आरोपी असलेले मोहम्मद रिझवान डावरे व राहिल अतुर रहमान शेख हेही पुण्यातील रहिवाशी असून, ते मागील दहा वर्षांपासून फरार आहेत.
मुंबईत लोकलमध्ये एकापाठोपाठ सात बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. त्यात १८९ नागरिक ठार, तर ८१९ नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात दहशतवादी विरोधी पथकाने १३ जणांना गजाआड केले होते. त्यातील १२ जणांना विशेष न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यांना बुधवारी शिक्षा सुनावण्यात आली. बॉम्बस्फोटात थेट सहभाग असणाऱ्या पाचजणांना फाशीची, तर इतर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला रोहेल शेख (वय ४३) हा लष्कर परिसरातील भीमपुरा येथे राहात होता. बंदी घातलेल्या ‘सीमी’ या दहशतवादी संघटनेत तो कार्यरत असल्याची नोंद पुणे पोलिसांनी केली आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर दहा दिवसांनी सोहेलला पोलिसांनी लष्कर परिसरातून अटक केली होती. सोहेल हा जिरायत या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने व्हिसा मिळवून इराण येथे गेला होता. त्यानंतर तो इराकमार्गे पाकिस्तानात गेला. बॉम्बस्फोटातील इतर आरोपींसोबत त्याने दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले. त्याच ठिकाणाहून आरडीएक्सची तस्करी करण्यात आली व हे आरडीएक्स नंतर बॉम्बस्फोटात वापरण्यात आले. पुण्यातील फरार आरोपी मोहम्मद डावरे व अतुर शेख यांना हवालामार्फत बॉम्बस्फोटासाठी आर्थिक रसद पुरविण्यात आली असल्याचे तपासात पुढे आले आहे. हे दोघेही दहा वर्षांपासून फरार आहेत. ते पाकिस्तान किंवा सौदी अरेबियात असल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2015 रोजी प्रकाशित
मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोटातील पुण्यातले दोन आरोपी दहा वर्षांपासून फरार
बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात आरोपी असलेले मोहम्मद रिझवान डावरे व राहिल अतुर रहमान शेख हेही पुण्यातील रहिवाशी असून, ते मागील दहा वर्षांपासून फरार आहेत.
Written by दया ठोंबरे
First published on: 01-10-2015 at 03:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local bombblast accused absconding