कुर्ला ते शिवाजीनगर उपनगरी सेवा सुरू करण्याचे नियोजन
मुंबई ते पुणे असा जवळपास दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे! पुणे व मुंबई या दोन शहरांना जोडणारी ईएमयू लोकल सेवा सुरू करण्याची योजना मध्य रेल्वेने आखली असून मुंबईतील कुर्ला व पुण्यातील शिवाजीनगर स्थानकांदरम्यान ही लोकल धावणार आहे. त्या दृष्टीने तांत्रिक चाचणीही सुरू झाली आहे.
मध्य रेल्वेने कुर्ला ते शिवाजीनगर या दरम्यान ईएमयू सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर या सेवेची आखणी करण्यात येत असून, त्यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टींबाबत मध्य रेल्वेच्या वतीने रेल्वे बोर्डामध्ये परवानगी मागण्यात आली आहे. शिवाजीनगर ते कुर्ला ही लोकल सेवा सुरू करण्यासाठी लोकलच्या स्वतंत्र युनिटची मागणीही रेल्वे बोर्डाकडे नोंदविण्यात आली आहे. १२ डब्यांचे हे युनिट असणार आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी पनवेलजवळ मेन व हार्बर या दोन लाइन्स जोडाव्या लागतील.
१२ डब्यांच्या लोकलच्या युनिटला इंजिनचे चार डबे असतात. मात्र, खंडाळा घाट चढण्यासाठी आणखी दोन इंजिन्सची गरज लागणार आहे. त्याचप्रमाणे शिवाजीनगर ते कुर्ला हे अंतर सुमारे १८० किलोमीटर आहे. रेल्वेच्या नियमानुसार १६० किलोमीटर अंतराच्या पुढे रेल्वेमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था असणे गरजेचे असते. मात्र या विशेष सेवेसाठी या नियमातून सूट देण्याची मागणीही रेल्वे बोर्डाकडे करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यास दिवसातून दोन ते तीन फेऱ्या सुरू होऊ शकतात. आणखी फेऱ्यांसाठी मात्र अधिक युनिट व लोहमार्गाचे विस्तारीकरण करावे लागले, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-पुणे थेट लोकल!
मुंबई ते पुणे असा जवळपास दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे! पुणे व मुंबई या दोन शहरांना जोडणारी ईएमयू लोकल सेवा सुरू करण्याची योजना मध्य रेल्वेने आखली असून मुंबईतील कुर्ला व पुण्यातील शिवाजीनगर स्थानकांदरम्यान ही लोकल धावणार आहे. त्या दृष्टीने तांत्रिक चाचणीही सुरू झाली आहे.
First published on: 23-02-2013 at 06:29 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune direct local