मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका आता प्राण्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे २ वर्षे इतके आहे.

शनिवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान ओझर्देगाव हद्दीतील उर्से टोल नाक्याजवळ ही घटना घडली. पाण्याच्या शोधात बिबट्या या ठिकणी आला असावा, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बिबट्याला धडक दिलेल्या वाहनाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. वन विभागाने भारतीय वन्यजीव कायद्यातील कलमानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

परिसरामध्ये असणाऱ्या घनदाट झाडीमुळे या ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याचे दिसते. बिबट्याच्या वृत्तामुळे परिसरात भीतीचे वातावरण असताना या अपघातामुळे द्रुतगती मार्ग आता प्राण्यांसाठी घातक ठरत असल्याचे दिसते आहे.