पुणे : जागतिक पातळीवर मंदीचे वारे असूनही देशातील गृहनिर्माण क्षेत्राने जोरदार कामगिरी नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशात एकूण ३ लाख ७९ हजार घरांची विक्री झाली. त्यांचे एकूण मूल्य ३ लाख ४७ हजार कोटी रुपये आहे. घरांच्या एकूण विक्री मूल्यात देशात पुण्यात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्था ‘अनारॉक ग्रुप’ने मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील गृहनिर्माण क्षेत्राच्या कामगिरीचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, देशातील सात महानगरांमध्ये मागील आर्थिक वर्षात ३ लाख ७९ हजार घरांची विक्री झाली. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ही विक्री ३६ टक्के जास्त आहे. मागील आर्थिक वर्षात ३ लाख ४७ हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात ४८ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
हेही वाचा – पुणे : दोन हजारांच्या नोटांमुळे पेट्रोल पंपचालकांची डोकेदुखी वाढली
मुंबई महानगरांमध्ये सर्वाधिक विक्री नोंदवण्यात आली. घरांची विक्री आणि एकूण विक्रीचे मूल्य यात मुंबई महानगरांचा वाटा ३० टक्के आहे. मुंबईत १ लाख ६७ हजार घरांची विक्री झाली. घरांच्या विक्रीत पुणे दुसऱ्या स्थानी आहे. पुण्याचा घरांच्या विक्रीत वाटा १७ टक्के आहे. विक्री झालेल्या घरांचे एकूण मूल्य विचारात घेता सर्वच महानगरांत २४ ते ७७ टक्के वाढ नोंदवण्यात आली. देशात सर्वाधिक ७७ टक्के वाढ पुण्यात नोंदवण्यात आली आहे.
देशातील निवासी बांधकाम क्षेत्राच्या वाढीला गती मिळत आहे. या क्षेत्राने उच्चांकी वाढ नोंदवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. – अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप
हेही वाचा – “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, कारण…”, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
घरांच्या विक्रीतील हिस्सा (टक्क्यांमध्ये)
- मुंबई : ३०
- पुणे : १७
- दिल्ली : १६
- बंगळुरू : १४
- हैदराबाद : १३
- कोलकता : ६
- चेन्नई : ४