कृष्णा पांचाळ, पिंपरी- चिंचवड
पिंपरीतील रहाटणी येथे राहणाऱ्या कृष्णा शिरसाटला चार चाकी गाडी चालवण्याची हौस होती… मुलाची ही हौस पूर्ण करण्यासाठी वडिलांनी गेल्या वर्षीच त्याला एक कार घेऊन दिली… मुलाला प्रेमानं दिलेली कार त्याच्या जिवावर बेतेल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल.. पण रविवारी याच कारच्या अपघातात कृष्णाचा मृत्यू झाला आणि हे ऐकून शिरसाट कुटुंबियांना धक्का बसला.
रविवारी पुणे – मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. यात पिंपरीतील कृष्णा शिरसाट (वय २२), संजीव मोहरसिंग कुशवाह (वय १७) आणि निखिल सरोदे (वय २०) या तीन तरुणांचा मृत्यू झाला. यातील कृष्णा हा रहाटणी परिसरात राहतो. अपघात झाला त्यावेळी तोच कार चालवत होता.
कृष्णाला आधीपासूनच कार चालवायला आवडायची. मुलाची कारची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील रमेश यांनी गेल्या वर्षी जाधव नावाच्या व्यक्तीकडून स्विफ्ट कार विकत घेतली होती. पैसे कमावण्यासाठी कृष्णा भाडे तत्वावर गाडी चालवायचा.
रविवारी कृष्णा आणि त्याच्या मित्रांनी लोणावळा येथे फिरायला जाण्याचा प्लॅन केला. यासाठी कृष्णाने स्वत:ची कार नेण्याचे ठरवले. तो स्वतः कार चालवत होता. तर त्याचा एक मित्र बाजूच्या सीटवर आणि बाकीचे मागच्या सीटवर बसले होते. लोणावळ्याला जात असताना कार्ला फाट्याजवळ कृष्णाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि यात त्याच्यासह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. वडिलांनी प्रेमाने भेट म्हणून दिलेल्या कारमध्येच कृष्णाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शिरसाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.