कृष्णा पांचाळ, पिंपरी-चिंचवड

प्रतीक तू आमच्या सोबत येऊ नकोस….हे ५०० रुपये घे आणि तू तुझ्या मित्रांसोबत नंतर फिरायला जा, असे निखील सरवदे त्याच्या लहान भावाला सांगत होता. मात्र, प्रतीकने हट्ट धरला आणि तो निखीलसोबत फिरायला गेला. दुर्दैवाने त्यांच्या कारचा मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर अपघात झाला आणि या अपघातात निखील आणि प्रतीक या सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला.

रविवारी पुणे – मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ मोटारीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. यात निखील बालाजी सरवदे (वय २०) आणि प्रतीक सरवदे (वय १८) या सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. कुटुंबातील दोन्ही मुलांचा अपघातात मृत्यू झाल्याने सरवदे कुटुंबियांना मानसिक धक्काच बसला आहे. ‘निखीलने प्रतीकला आमच्यासोबत येऊ नको असे सांगितले होते. प्रतीकने त्याचे ऐकले असते तर तो तरी वाचला असता’, हे सांगताना सरवदे कुटुंबियांना अश्रू आवरता येत नव्हते.

रविवारी निखील हा त्याच्या मित्रांसोबत कारने लोणावळा येथे फिरायला जाणार असल्याचे प्रतीकला समजले. प्रतीकलाही लोणावळ्यात फिरायला जायचे होते. यासाठी त्याने मोठा भाऊ निखीलकडे हट्ट धरला. निखिलने प्रतीकची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘५०० रुपये घे, तू तुझ्या मित्रांसोबत नंतर फिरायला जा, असे निखिलने त्याला सांगितले होते. ‘तुझं नाव आईला सांगेन असे प्रतीकने सांगितल्याने निखील शेवटी त्याला घेऊन जाण्यास तयार झाला’, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली. मात्र, नियतीने त्यांचा घात केला आणि या भावडांचा हा प्रवास शेवटचा ठरला.

निखील आणि प्रतीकच्या वडिलांचे दहा वर्षापूर्वीच निधन झाले आहे. निधनापूर्वी वडिलांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर होतं. निखील घरातील मोठा मुलगा असल्याने त्याला जबाबदारीची जाणीव होती. त्याने अथक मेहनत करत हे कर्ज फेडले देखील होते. निखील बँकेच्या कर्ज विभागात कार्यरत होता. तर प्रतीक हा सांगवीतील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होता. प्रतीक आणि निखीलच्या पश्चात कुटुंबात आई आणि आजी आहे.