पुणे : ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात इंटरमिजिएट परीक्षेत मुंबईच्या परमी पारेखने देशात पहिला क्रमांक पटकावला असून, फाउंडेशन परीक्षेत १९.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

आयसीएआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. देशभरातील ४५९ केंद्रांवर इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात आली. दोन्ही गटांची परीक्षा दिलेल्या २३ हजार ४८२ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ६९ हजार २२७ विद्यार्थ्यांनी गट एकची परीक्षा दिली होती. त्यापैकी १० हजार ५०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर गट दोनची परीक्षा दिलेल्या ५० हजार ७६० विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ११७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबईच्या परमी पारेखने ८०.६७ टक्क्यांसह देशात पहिला क्रमांक पटकावला. चेन्नईच्या तनया गुप्ताने ७६.५० टक्क्यांसह द्वितीय, नवी दिल्लीच्या विधी जैनने ७३.५० टक्क्यांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.

हेही वाचा…‘मावळ पॅटर्न’वरून अजितदादांच्या आमदाराचा भाजपला इशारा; म्हणाले, राज्यभरात…

देशभरातील ४५३ केंद्रांवर फाउंडेशन परीक्षा आयोजित करण्यात आली. परीक्षा दिलेल्या ७० हजार ४३७ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये ७ हजार ७३२ मुले, ६ हजार १२६ मुली आहेत.