नागपूर दौऱ्यामध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकांशी चर्चा करताना नेते आणि मंत्र्यांना बाहेर काढले. आता आम्ही काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढू, असे भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राहुल गांधी काँग्रेसला विजयापर्यंतदेखील नेऊ शकणार नाहीत. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांना चीतपट केले. राहुल गांधी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये फिरले. मात्र, तेथेही काँग्रेसची सत्ता येऊ शकली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशभर दौरा करावा. ते जेवढे लोकांच्याजवळ जातील तेवढे लोक काँग्रेसपासून दूर जातील, असेही मुंडे यांनी सांगितले.
‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या टीकेचा मुंडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मोदी यांच्यामुळे भाजपला चैतन्य लाभले असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला दोनशेहून अधिक जागा मिळतील. ज्यांच्या ९ जागा निवडून येऊ शकत नाहीत त्यांनी आमच्या पक्षाची उठाठेव कशाला करायची? ते गेली २५ वर्षे बाशिंग बांधून बसले आहेत, असेही ते म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपावरून रामदास आठवले यांनी बाहेर पडण्याची वाच्यता केली असल्याचे निदर्शनास आणून देताच मुंडे म्हणाले, आमची जागावाटपाची बोलणी लवकरच होईल. माझी आठवले यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली आहे. आगामी निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणूनच िरगणात उतरणार आहोत. त्यांना बाहेर पडावे लागेल अशी परिस्थिती अजिबात नाही.
..तर मेधा पाटकर यांच्याविरुद्ध
अब्रुनुकसानीचा दावा
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या लिलावामध्ये गुंतलेल्या राजकीय नेत्यांमध्ये आपले नाव मेधा पाटकर यांनी घेतले आहे, असे विचारले असता गोपीनाथ मुंडे म्हणाले, ‘‘मेधा पाटकर यांनी माझे नाव का घेतले हे माहीत नाही. मी कोणताही साखर कारखाना विकत घेतलेला नाही. माझा साखर कारखाना संघाशी संबंध नाही. युती सरकारच्या काळात एकाही साखर कारखान्याचा लिलाव झालेला नाही. आपली माहिती तपासून पाटकर यांनी यासंदर्भात तीन दिवसांत खुलासा करावा. अन्यथा मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा