मुंढवा जॅकवेल प्रकल्पाला विरोध करणारी याचिका फेटाळली गेल्यामुळे युद्धपातळीवर काम करून हा प्रकल्प आता १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी दिली. या प्रकल्पामध्ये अडसर आला नसता, तर धरणामध्ये तीन ते सव्वातीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला असता, असेही त्यांनी सांगितले.
मुंढवा जॅकवेल येथे प्रक्रिया केलेले पाणी शेतीला देण्यासाठी शेतातून जलवाहिनी टाकण्यास विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून नंतर ते नदीत सोडण्यात येते. हे प्रक्रिया केलेले पाणी शेतीला देण्याची योजना महापालिकेने आखली आहे. त्यासाठी मुंढवा येथे जॅकवेल उभारला असून प्रक्रिया केलेले साडेसहा टीएमसी पाणी साडेसतरा नळी येथील छोटय़ा कालव्यामध्ये (बेबी कॅनॉल) सोडले जाणार आहे. मात्र, संदीप तुपे या शेतक ऱ्याने या जलवाहिनीला त्यांच्या शेतातून नेण्यास हरकत घेतल्यामुळे जलवाहिनीचे काम थांबले होते. मात्र, हा अडसर दूर झाल्यामुळे महापालिकेला हा प्रकल्प लवकर पूर्णत्वास जाणार असून २० हजार ११८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली जाणार आहे.
मुंढवा जॅकवेल प्रकल्प आता तातडीने १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. जॅकवेलच्या जलवाहिनीसाठी १५ ते २० फूट खोदाई करावी लागणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी बेबी कॅनॉलमधून शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. मांजरी स्टड फार्म येथील दुरुस्ती राहिली होती. ही सारी कामे युद्धपातळीवर काम करून १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या धरणामध्ये सव्वादोन टीएमसी पाणीसाठा असून तो ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा आहे. धरणक्षेत्रामध्ये आता पाऊस सुरू झाला आहे. शेतीसाठी चौथे आवर्तन सोडण्यात आले असून जिल्ह्य़ातूनही पाणीटंचाईची तक्रार आलेली नाही. मुंढवा जॅकवेलचे काम अडले नसते, तर धरणामध्ये तीन ते सव्वातीन टीएमसी पाणीसाठा राहिला असता, असेही त्यांनी सांगितले.
मुंढवा जॅकवेल प्रकल्प १५ दिवसांत पूर्ण करणार – पालकमंत्री गिरीश बापट
मुंढवा जॅकवेल प्रकल्पाला विरोध करणारी याचिका फेटाळली गेल्यामुळे हा प्रकल्प आता १५ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली
First published on: 19-06-2015 at 03:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mundhwa jackwell project