पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना दिलेली सहा दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने शनिवारी दिवसभर कारवाई केली. महापालिकेच्या अतिक्रमण विराेधी पथकाने पहिल्या दिवशी ४२ एकर क्षेत्रफळावरील १८ लाख ३६ हजार ५३२ चौरस फूटावरील २२२ बांधकामे भुईसपाट केली.

महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या अतिक्रमण कारवाई राबविली. पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष कारवाईस्थळास भेट देऊन पाहणी केली तसेच प्रशासनाला सूचना देखील केल्या. या कारवाईदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचिता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, उमेश ढाकणे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही निष्कासन कारवाई करण्यात आली. अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली. ४२ एकर क्षेत्रावरील २२२ अनधिकृत गोदामे, पत्राशेड, बांधकामे भुईसपाट केली. चार कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. १६ पोकलेन, आठ जेसीबी, एक क्रेन आणि चार कटरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. तीन अग्निशमन वाहने, दोन रुग्णवाहिका येथे तैनात करण्यात आल्या होत्या, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

नेटवर्क बंद

कारवाई करण्यात येणाऱ्या परिसरात व्यापाऱ्यांनी मोबाईल वापरू नये यासाठी प्रशासनाकडून सकाळपासूनच नेटवर्क बंद ठेवण्यात आल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला.

Story img Loader