लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना ‘शून्य प्रलंबितता’चा (झिरो पेण्डन्सी) विसर पडला असून त्यांच्या स्वाक्षरीसाठी नस्ती (फायली) धूळखात पडून आहेत. सुमारे चारशेहून अधिक नस्ती आयुक्तांच्या स्वाक्षरीमुळे प्रलंबित आहेत. आयुक्त दालनासमोरील प्रतीक्षा रूममध्ये अधिकारी नस्ती घेऊन स्वाक्षरी घेण्यासाठी बसतात. काही तासांनी नंबर आल्यावर महत्वाची नस्ती कोणती आहे असे विचारत एकाच नस्तीवर स्वाक्षरी होत असल्याचा अनुभव अधिकाऱ्यांना आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासक राजवट सुरू आहे. गेल्या सव्वा वर्षांपासून शेखर सिंह प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. प्रशासकीय व जनतेची कामे वेळेत हाेण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी शून्य प्रलंबितता सारखे उपक्रम राबविले जातात. मात्र, आयुक्त सिंह यांना या उपक्रमाचा विसर पडला असून त्यांच्याकडे स्वाक्षरीसाठी नस्तीचा ढिगारा पडला आहे. महापालिकेत पदाधिकारी, नगरसेवक नसल्याने विषय समित्या नाहीत. त्यामुळे शहर विकासाची अथवा अन्य विषयांच्या नस्ती सर्व प्रथम आयुक्तांकडे जाते. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय काहीच होऊ शकत नाही.
आणखी वाचा-महाराष्ट्रातील काही भागात पुढील दोन दिवस पावसाची हजेरी
विभागाच्या एखाद्या महत्वाच्या नस्तीवर आयुक्तांची स्वाक्षरी घेण्यासाठी अनेक उपायुक्त, सहायक आयुक्तांना तासन्-तास बसून रहावे लागत आहेत. अधिकाऱ्यांना बसण्यासाठी आयुक्त दालनासमोर प्रतीक्षा रूम आहे. या रूममध्ये अधिकारी स्वाक्षरीसाठी प्रतीक्षा करत बसलेले असतात. त्यानंतरही नस्तीवर आयुक्तांची स्वाक्षरी हाेईल की नाही याची अधिका-यांना शाश्वती नसते. सर्व नस्तीपैकी अतिशय महत्त्वाची कोणती नस्ती आहे असे विचारत आयुक्तांकडून एकाच नस्तीवर स्वाक्षरी केली जात असल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. सद्यस्थितीत आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी एका- एका विभागाच्या ६० ते ७० नस्ती प्रलंबित आहेत. त्याचबराेबर शहरातील नागरिक, विविध संघटना आयुक्तांना विविध निवेदने देतात. या टपालांची संख्याही माेठी असल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्याभरात हिवाळी अधिवेशन, सार्वजनिक, खासगी सुट्यामुळे आयुक्त अपवादात्मकवेळीच महापालिकेत फिरकले आहेत. चिंचवड येथील ॲटो क्लस्टरमधून काम करण्यावर त्यांचा भर दिसून येतो.
आणखी वाचा-रेल्वेचे असेही ‘कोट्यधीश’ तपासनीस! फुकट्या प्रवाशांना भरवताहेत धडकी
प्रशासकीय राजवटीतील गतिमान कारभाराची अपेक्षा फोल!
महापालिकेत नगरसेवक नसल्याने गतिमान कारभार होऊन शहर विकासाला हातभार लागेल, अशी शहरवासीयांची भावना होती. मात्र, प्रशासकीय राजवटीत जाब विचारणारेच कोणी नसल्याने अधिकारी मनमानी पध्दतीने कारभार करत आहेत. प्रशासक सिंह यांचा अधिकारी-कर्मचा-यांवर वचक नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. आयुक्त सिंह महापालिकेत नसले की उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयातून गायब होतात, असे दिसून येते.