पिंपरी : शहरातील रस्त्यांची पावसामुळे चाळण झाली असून सर्वच भागातील रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. आता  महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनीच यंदा शहरात जास्तच खड्डे असल्याची कबुली दिली. तसेच पाऊस उघडला असून येत्या चार दिवसात काेणतीही कारणे न सांगता शहर खड्डेमुक्त करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सर्वच भागातील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. शहरात पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर असे २६०६ खड्डे आढळून आले. यामधील डांबर, काेल्ड मिक्सने ११३८, खडीने ३७६,  पेव्हिंग ब्लाॅकने ३७६ तर सिमेंट कॉंक्रिटने १५० असे २०५० खड्डे बुजविण्यात आले. साेमवारअखेर (५ ऑगस्ट) ५५६ खड्डे असल्याचा  महापालिकेचा दावा आहे. प्रत्यक्षात शहरातील विविध भागातील रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात खड्डे असल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा >>>Pune Crime News: पुण्यात रस्त्यावर होणाऱ्या वादातून मारहाणीचे प्रकार वाढीस; अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराला गजाने मारहाण

महापालिका आयुक्त आयुक्त सिंह यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील खड्ड्यांवरून  अधिका-यांना जाब विचारला. गेल्या दाेन वर्षांच्या तुलनेत यंदा शहरात अधिक खड्डे असल्याचे दिसून येत असल्याचे आयुक्तांनीच सभेत कबुल केले. खड्डे कसे माेजता, काेणत्या रस्त्यावर किती खड्डे आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. आता पाऊस उघडला असून काेणतीही कारणे न सांगत येत्या चार  दिवसात शहर खड्डे मुक्त करण्याचे आदेशही आयुक्त सिंह यांनी अधिका-यांना दिले.

खड्डे बुजविण्यासाठी ३२ पथके

शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर चार असे एकूण ३२ रस्ते दुरुस्ती पथके नेमण्यात आले आहेत. रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

प्रभागनिहाय खड्ड्यांची संख्या

प्रभाग   खडड्यांची संख्या

अ   – ११२

ब –    ९०

क –  ३२

ड-    ८१

इ-    ३३

फ-    ११२

ग-      ६०

ह-       १८

प्रकल्प विभाग– १८

एकूण – ५५६

शहरात २६०६ खड्डे आढळून आले हाेते. त्यापैकी २०५० खड्डे बुजविण्यात आले आहेत. ५५६ खड्डे बुजविण्याचे बाकी आहेत. पावसाने उघडीप दिली असून युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची माेहिम हाती घेतली असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal commissioner shekhar singh confession that there are many potholes in pune city pune print news ggy 03 amy