पिंपरी – चिंचवड शहरामध्ये अनधिकृत फलकांवर जोरदार कारवाई सुरू आहे. यातून राजकीय नेत्यांना देखील सूट नाही. पिंपरी- चिंचवड शहरातील ‘ग’ आणि ‘ह’ प्रभागात आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या फलकावर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. यामुळे महानगरपालिकेचे कौतुक होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पिंपरी- चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनधिकृत फलकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
ज्या ठिकाणी अनधिकृत फलक लावण्यात येईल तिथं पोलिसांनी किंवा महानगरपालिकेने कारवाई करावी असे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. कुठल्याही पक्षाचे आणि नेत्याच फलक असलं तरी त्यावर कारवाई करण्यात यावी. असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री यांनी दिला होता. यालाच अनुसरून सध्या पिंपरी- चिंचवड महानगरपालिका कारवाई करताना दिसत आहे.
‘ग’ प्रभाग आणि ‘ह’ प्रभागात लावण्यात आलेल्या फलकांवर आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगे यांचे फोटो होते. दोन्ही आमदारांचे वेगवेगळे फलक लावण्यात आले होते. त्यावर महानगरपालिकेने कारवाई करत ते फलक काढून टाकले आहेत. या कारवाईचं पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांनी कौतुक केल आहे. या कामगिरीमध्ये पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने सातत्य ठेवणे गरजेचे देखील आहे.