प्रशासन-ठेकेदाराच्या वादात दोन महिन्यांचे वेतन रखडले

पालिकेच्या वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडे काम करणाऱ्या कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळलेले नाही. महापलिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या वादात वेतन रखडले असून ऐन दिवाळीच्या काळात वेतन न मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वाढ होत असून कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राज्य शासनाने बंद केली आहे. त्यामुळे सर्व खात्यांना नागरी सेवा देणाऱ्या यंत्रणांवर ताण येत आहे. त्यामुळे कमी वेतनावर कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयाकडे काम करणाऱ्या या कंत्रांटी कामगारांना किमान वेतन आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यातच कर्मचाऱ्यांचे वेतनही गेल्या दोन महिन्यांपासून रखडले असल्याची बाब पुढे आली आहे.  येत्या दोन दिवसांत वेतन न मिळाल्यास ऐन दिवाळीत काम  बंद करून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार आणि कामगार संघटनांनी दिला आहे.

दरम्यान महापालिका कामगार युनियनच्या वतीने यासंदर्भात प्रशासनाला सातत्याने निवेदने देण्यात आली आहेत. वेतन मिळावे यासाठी निदर्शने, आंदोलनेही करण्यता आली आहेत. मात्र कंत्राटी कामगारांचे प्रश्न प्रशासनाकडून गांभीर्याने घेण्यात येत आहीत. त्यामुळे युनियनच्या माध्यमातून न्यायालयीन लढा देण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्यनिर्वाह निधी आणि ईएसआयची रक्कम कापून रोज ४६१ रुपये प्रमाणे ११ हजार ९८६ रुपये वेतन देणे अपेक्षित आहे. मात्र दररोज ४३० रुपये याप्रमाणे ११ हजार १८० रुपयांचे वेतन दिले जात असून २५० कंत्राटी कामगारांचे दर दिवसाचे ७ हजार ७५० रुपये कुठे जातात? त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा युनियनचे कार्याध्यक्ष चंद्रकांत मगरे, संयुक्त चिटणीस मधुकर नरसिंगे, विभागीय अध्यक्ष राम अडागळे, सचिव करूणा गजधनी, बाळासाहेब जाधव, संतोष गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

मनपा कर्मचारी कामगार युनियनचे आंदोलन

महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस द्यावा आणि अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महापालिका कर्मचारी कामगार युनियनच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. महापलिकेमध्ये वेगवेगळ्या खात्यात मिळून पाच हजारापेक्षा अधिक कंत्राटी कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. या कामगारांना समान काम समान वेतन या निकषाप्रमाणे लाभ देण्यात येत नाहीत. या पाश्र्वभूमीवर युनियनच्या अध्यक्षा किरण मोघे, सचिव प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.