पुणे : शहर आणि परिसरातील पबपैकी २३ च पब अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एका पबची परवानगी रद्द करण्यात आली आहे. ॲड. समीर शेख यांनी माहिती अधिकारांतर्गत पुणे पोलिसांकडे अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी पुणे शहरातील अधिकृत पब आणि डिस्को चालकांची नावे, पत्ते, पब आणि डिस्को चालवण्यासाठीच्या आवश्यक अटी आणि नियम याबाबतची माहिती मागितली होती. त्या अर्जाला पुणे पोलिसांकडून देण्यात आलेल्या उत्तरामध्ये २३ पबची यादी देण्यात आली असून, त्यातील एका पबची परवानगी रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कार्यक्रम परवान्यासाठी विविध प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या ना-हरकत पत्रातील अटी-शर्तींचे पालन, पार्किंग आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, कोणत्याही धार्मिक, जातीय भावना दुखावल्या जातील अशा आक्षेपार्ह प्रतिमांचे प्रदर्शन न करणे, घोषणा देणे किंवा वाद्य वाजवणे, अश्लील नृत्य किंवा हावभाव किंवा तत्सम प्रकार करू नयेत, कार्यक्रमाची वेळ सकाळी साडेअकरा ते रात्री दीड, आवाजाच्या मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे, ध्वनिप्रदूषण अधिनियम २००९ आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या नियमावलीचे पालन करणे, अनुज्ञप्तीचे वेळोवेळी नूतनीकरण करून घेणे, परदेशी कलाकारांचा कार्यक्रम करण्यापूर्वी महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांची परवानगी घेणे या अटींवर परवाना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा…पालखी सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त, पाच हजार पोलीस तैनात; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोहळ्यावर नजर

कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच

महापालिकेने पब, बारवर दुसऱ्या दिवशीही कारवाई केली. बाणेर, शिवाजीनगर आणि हडपसर परिसरात १९ ठिकाणी कारवाई करून ५६ हजार ६१ चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट परिसर, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, हडपसर परिसरातील पब, बार, रेस्टॉरंटमधील अनधिकृत बांधकामे महापालिकेकडून पाडण्यात आली. गेल्या दोन दिवसांत ९२ हजार ९०६ चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. त्यात मंगळवारी ३६ हजार ८४५ चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते.