महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शनिवार रविवारच्या सुट्ट्यांमुळे कचरा संकलनाचे काम योग्य प्रकारे होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांना ‘सुट्टी’ देण्याचा निर्णय महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.या निर्णयानुसार आठवड्यातील एक दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाणार आहे. शनिवार आणि रविवार त्यामधून वगळण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कचरा संकलनाची प्रक्रिया योग्य प्रकारे होईल, असा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे भौगोलिक क्षेत्र वाढण्याबरोबरच कचरा निर्माण होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. शहरात दैनंदिन २ हजार २०० ते २ हजार ३०० मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होतो. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे संकलन करून कचरा प्रक्रिया प्रकल्पांवर पाठविण्यात येतो.महापालिकेच्या बहुतांश स्वच्छता कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने या दिवशी केवळ वीस टक्क्यांच्या आसपास कर्मचारी कामावर असतात. त्यामुळे कचऱ्याचे संकलन योग्य पद्धतीने होत नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागल्याचे चित्र कायम दिसून येते. त्यातच शासकीय सुट्टी असेल तर कचरा उचलला जात नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचे फेरनियोजन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे: भांडारकर संस्थेचा ‘गीतेविना श्रीकृष्ण’ संशोधन प्रकल्प; वर्षभरात वाचकांच्या हाती ग्रंथ देण्याचा मानस
शनिवार आणि रविवारी कचरा उचलला न गेल्याने सोमवारच्या कचऱ्याची त्यामध्ये भर पडते. त्यामुळे शनिवार ते सोमवार कचऱ्याचे संकलन कमी प्रमाणात होते. त्यामुळे आता आठवड्यातील एक दिवस कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाणार आहे. कचरा संकलनासाठी अधिकाधिक कर्मचारी उपलब्ध होतील, याचे नियोजन करण्यात आले असून या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.