पुणे : पीएमसी केअर ॲपवर नागरिकांनी नोंदविलेल्या तक्रारींवर संबंधित तक्रारदाराचा अभिप्राय घेऊन मगच तक्रार बंद करण्याच्या सूचना महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे तक्रारनिवारण झाले नसतानाही ते झाले असे सांगून ऑनलाइन तक्रार काढून टाकण्याचे प्रकार बंद होणार आहेत.
शहरातील विविध भागांत असलेल्या तक्रारी तसेच समस्या महापालिकेला कळविता याव्यात, यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी ‘पीएमसी केअर’ हे ॲप सुरू केले आहे. शहरातील विविध भागात तुंबलेले गटारे, खराब झालेले रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, फुटलेल्या जलवाहिन्या, धोकादायक खांब, फलक अशा तक्रारी या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना करता येतात. तसेच, एक्स आणि इतर समाजमाध्यमातूनही या तक्रारी नोंदवता येतात. तक्रार नोंदवल्यानंतर नागरिकांना टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर एक ते दोन दिवसांतच नागरिकांना त्यांची तक्रार बंद करण्यात आल्याचा मेसेज येतो. मात्र, अनेकदा त्यावर प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही केली गेलेली नसते, अशा तक्रारी नागरिकांडून केल्या जात होत्या.
हे ही वाचा…‘‘दिवटा आमदार’ या शरद पवारांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले कडक उत्तर म्हणाले…!
यावर पालिकेकडून अनेकदा आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कामात सुधारणा होत नसल्याचे समोर आल्याने यापुढील आलेली तक्रार निकाली काढताना संबंधित तक्रारदाराचा अभिप्राय घेण्याच्या सूचना संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
पाणीगळती, खड्डे दुरुस्ती, पथदिवे बंद या तक्रारी तातडीने सोडविल्या जातात. मात्र, जलवाहिनी, सांडपाण्याची वाहिनी बदलणे, रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण करणे, ही कामे लगेच होत नाहीत. त्यामुळे या कामांना नक्की किती वेळ लागेल, याची कल्पना संबंधित तक्रारदारांना फोनवर दिली जाईल, त्यानंतरच त्यांची तक्रार बंद केली जाईल.- पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका