पिंपरी : बेकायदा हाेर्डिंग, फलक लावणाऱ्या दाेन जणांवर महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाने विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच व्यावसायिक आणि नागरिकांकडून ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत रवींद्र रामदास काळाेखे यांच्यावर चिखलीत तर ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत श्रीनिवास मडगुंजी यांच्यावर भाेसरी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेशकुमार सहा यांच्याकडून २५ हजार रुपये, सुखवाणी बांधकाम व्यावसायिकाकडून १५ हजार रुपये, प्रशांत गिरीधर तलवारे यांच्याकडून तीन हजार, श्रीहरी संजय शिंपी यांच्याकडून दोन हजार रुपये, राहुल गुट्टे यांंच्याकडून दीड हजार रुपये असा ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>रामटेकडीत भंगार मालाच्या गोदामाला आग; रहिवासी भागात आग लागल्याने घबराट
शहरातील फलकधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. चौक, मोकळ्या जागा, सीमाभिंत, खांब अशा ठिकाणी बेकायदेशीरपणे फलक झळकत हाेते. त्यामुळे महापालिकेने २७ नाेव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीत विशेष माेहीम राबविली. या माेहिमेमध्ये ८३३५ होर्डिंग, किऑक्स, फलक काढण्यात आले. बेकायदा फलक लावणाऱ्यांवर दंड करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार दाेघांवर गुन्हे दाखल, तर पाच जणांकडून ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाईची माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.