पुणे : ‘सूस येथील घनकचरा प्रकल्प आजच बंद करा; नाही तर या प्रकल्पाविरोधात खुर्ची टाकून बसावे लागेल,’ असा इशारा कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला दिला. मंत्री पाटील यांनी दिलेल्या आदेशामुळे महापालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे. मात्र, ‘हा प्रकल्प बंद करणे अशक्य असल्याचे स्पष्ट करून प्रत्यक्ष जागेवर जाऊन या प्रकल्पाची पाहणी करून अडचणी समजावून घ्याव्यात,’ अशी विनंती महापालिका प्रशासनाने पाटील यांना करण्याचा निर्णय घेतला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्याबरोबर बैठक झाली. बैठकीत ‘संबंधित प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रकल्प इतर ठिकाणी हलविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात येणारी जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. लवकरच आवश्यक ती कार्यवाही केली जाईल,’ असे उत्तर प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर ‘हा प्रकल्प आजच्या आज बंद झाला पाहिजे. नाही तर या प्रकल्पाच्या विरोधात खुर्ची टाकून बसावे लागेल,’ असा इशारा मंत्री पाटील यांनी महापालिकेला दिला. तसेच महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क करून चंद्रकांत पाटील यांनी हा प्रकल्प बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे.

‘महापालिकेने आवश्यक त्या नियमांची पूर्तता करून हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय देऊन नियमांचे पालन करून प्रकल्प सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे,’ असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सांगितले.

‘हा प्रकल्प तातडीने बंद करणे शक्य नाही. नागरिकांच्या काही तक्रारी असतील, तर महापालिका प्रशासनातील अधिकारी तसेच स्थानिक नागरिक, हे प्रत्यक्ष जागेवर जाऊन मंत्री पाटील यांच्यासमवेत पाहणी करण्यास तयार आहेत. यासाठी वेळ द्यावा,’ अशी विनंती पाटील यांना करणार असल्याचे पृथ्वीराज यांनी स्पष्ट केले.

सूस येथील प्रकल्पाचे काम २०४२ पर्यंत देण्यात आले आहे. हा प्रकल्प बंद केल्यास त्यांचे मोठे दायित्व महापालिकेवर पडणार आहे. या प्रकल्पाबाबत काही तक्रारी असतील, तर आवश्यक सुधारणा करण्याची महापालिकेची तयारी आहे. नियमांची पूर्तता करून सुरू केलेला कचरा प्रकल्प बंद केल्यास प्रत्येक भागातून कचरा प्रकल्प बंद करण्यासाठी दबाव येईल. हे शहरासाठी घातक आहे.- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका