पुणे : ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी महापालिकेची माता मृत्यू अन्वेषण समितीने केली होती. रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास, तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास आणि तिच्यावर उपचार करण्यास विलंब झाला किंवा कसे, याबाबतचा अहवाल समितीने तयार केला असून, तो केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण विभागाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली माता मृत्यू अन्वेषण समितीची बैठक झाली. या समितीत महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांच्यासह बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागाचे प्राध्यापक, राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि भूलतज्ज्ञ यांचा समावेश होता. समितीच्या चौकशीत प्रामुख्याने ईश्वरी यांना त्यांच्या कुटुंबीयांनी वेळेत आणले का, त्यांना रुग्णालयात नेण्यासाठीचा प्रवासाचा काळ जास्त होता का आणि तिच्यावरील उपचारास विलंब झाला का, या तीन प्रमुख कारणांचा शोध घेण्यात आला. समितीची बैठकीत यावर चर्चा करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
या समितीने रुग्णाचे सर्व वैद्यकीय अहवाल तपासले आहेत. याचबरोबर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांचे जबाब नोंदविले. तसेच, ईश्वरी यांच्या कुटुंबीयांचेही जबाब नोंदविले, असे सूत्रांनी नमूद केले. समितीचा अहवाल केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण विभागाच्या माता, बालमृत्यू सर्वेक्षण व प्रतिसाद संकेतस्थळावर गुरुवारी (ता. ११) रात्री उशिरा अपलोड करण्यात आला, असे सूत्रांनी स्पष्ट केले.