पुणे : महापालिकेच्या कोंढवा येथील कत्तलखान्यात नियमांचे पालन होत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिकेला कत्तलखाना बंद करण्याचा इशारा दिला. पंधरा दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करण्याची ग्वाही महापालिकेकडून देण्यात आल्याने कत्तलखान्यावरील कारवाई तूर्तास टळली आहे.
कोंढवा येथे महापालिकेच्या कत्तलखान्यात मोठ्या आकाराच्या जनावरांची कत्तल केली जाते. या ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावत कत्तलखाना बंद करण्याचा इशारा देण्यात आला. त्यावर महापालिकेने पुढील १५ दिवसांत आवश्यक ती काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे. हा कत्तलखाना असलेल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. दररोज सुमारे १५० जनावरांची कत्तल केली जाते. प्राण्यांचे अवयव, तसेच त्यांचे रक्त सांडपाणीवाहिनीत सोडण्यात येते. काही दिवसांपूर्वी येथील सांडपाणीवाहिनी बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. या ठिकाणी सांडपाण्याची तपासणी होत नाही. तसेच, मांसाची तपासणी केली जात नाही, अशा तक्रारी आल्या होत्या.
यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला धारेवर धरल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. याबाबतचा खुलासा प्रदूषण नियंत्रण मंडळाला करण्यात आला असून, १५ दिवसांत उपाययोजना करू, असे आश्वासन दिले आहे.‘कत्तलखान्याच्या परिसरात साचलेले सांडपाणी गोळा करण्यात येत आहे. या ठिकाणी दररोज साफसफाई केली जात आहे. कत्तलखान्याच्या परिसरात औषधांची फवारणी करण्यात येत आहे. कत्तलखान्याच्या ठिकाणी कचरा साचणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मासिक अहवाल प्रयोगशाळेकडून घेण्यात येत आहे,’ असा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने कत्तलखान्याबाबत केलेल्या सूचनांप्रमाणे उपाययोजना केली जात आहे. १५ दिवसांमध्ये सर्व उपाययोजना करण्यात येतील. कत्तलखान्यासंदर्भात सर्व विभागांची बैठक घेण्यात आली आहे. नवीन स्वतंत्र मलवाहिनी टाकण्यात येणार आहे. – नीना बोराडे (आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका)