पिंपरी : तीर्थक्षेत्र आळंदीतील रस्त्यांची आता रात्रीच साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि शहरातील मुख्य रस्त्यांची साफसफाई रात्रीच्या वेळी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाविकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात दर्शन घेता येणार आहे.
तीर्थक्षेत्र आळंदीत राज्यभरातून वारकरी दर्शनासाठी येत असतात. सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. माउलींच्या दर्शनासाठी आणि प्रदक्षिणेसाठी सकाळी मोठ्या संख्येने भाविक आळंदीत येतात. सकाळी सात वाजता रस्ते साफसफाईला सुरुवात केली जाते. त्यामुळे भाविकांना त्रास होतो. तसेच, रहदारीस अडथळा होतो. यातून मार्ग काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसर, आळंदी नगर परिषद रस्ता ते वाय जंक्शन, वाय जंक्शन ते चाकण चौक, चाकण चौक ते वडगाव चौक, वडगाव चौक ते मरकळ चौक, मरकळ चौक ते पोलीस ठाणे आणि पोलीस ठाणे ते नगर परिषद हे मुख्य रस्ते रात्री आठ ते बारा या वेळेत साफ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
रस्त्यावर कचरा टाकल्यास दंड
नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता घंटागाडीतच टाकावा. यापुढे ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचा नगर परिषदेचा मानस आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आळंदी स्वच्छ आणि सुंदर राहावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे. सकाळी रस्ते साफसफाई करताना भाविकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे रस्ते रात्रीच साफ करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना चांगल्या सुविधा देणे, शहर स्वच्छ ठेवणे याला प्राधान्य देण्यात आले असल्याचे आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.