लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कल्याणीनगर येथे झालेल्या भीषण अपघातानंतर शहरातील पबचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच पबच्या संख्येची कोणतीही नोंद महापालिकेकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बांधकाम नियमानुसार केवळ रेस्टॉरंट सुरू करण्यास महापालिका मान्यता देते. त्यामुळे तेथे पब सुरू आहे की नाही, याची माहिती नाही. पबची माहिती पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाकडे असेल, असे सांगत महापालिका प्रशासनाने हात झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
रूफटॉप हॉटेलची माहितीची नोंद असून अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यासंदर्भात जानेवारी महिन्यातच पोलिसांना पत्र दिल्याचेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
आणखी वाचा-पुणे : नोंदणीविनाच ‘पोर्शे’ रस्त्यावर, अपघातग्रस्त मोटारीबाबत आरटीओकडून धक्कादायक माहिती समोर
कल्याणीनगर भागातील पबमधून निघालेल्या तरुण-तरुणीला भरधाव मोटारीने रविवारी पहाटे धडक दिल्याने तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पबची संख्या किती यासंदर्भात महापालिकेकडे माहिती घेतली असताना पबची कोणतीही नोंद नसल्याचे पुढे आले. पबची स्वतंत्र नोंद ठेवली जात नाही. रेस्टारंट सुरू करण्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महापालिका परवानगी देते. त्यामुळे तेथे काय सुरू आहे, याची माहिती महापालिकेकडे नाही, असा दावाही करण्यात आला.
रूफटॉप हॉटेल्सची आकडेवारी महापालिका प्रशासनाकडे आहे. शहरात एकूण ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेल्स आहेत. त्यापैकी ७ हॉटेल्सना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम १९४९ चे कलमअंतर्गत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. यातील ५३ रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. तर, सहा हॉटेल मालकांनी स्वत:हून बांधकाम काढून घेतले आहे. सात हॉटेल्सचा वापर बंद असून, सात रूफटॉप हॉटेल्सबाबत स्टे ऑर्डर देण्यात आली आहे. तर नऊ हॉटेल्सवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून देण्यात आली.
आणखी वाचा-मतदान प्रक्रियेदरम्यान शिक्षकाचा मृत्यू, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांची नाराजी
शहरातील अनधिकृत रूफटॉप हॉटेल्ससंर्भात कारवाई करावी, असे पत्रही महापालिकेच्या बांधकाम विभागाने जानेवारी महिन्यात पोलिसांना दिले आहे. अस्तित्वातील अधिकृत इमारतीच्या टेरेसचा वापर आणि अनधिकृत रूफटॉप किंवा टेरेस हॉटेल्ससाठी होत आहे. इमारतीच्या दर्शनी बाजूच्या सामासिक अंतरामध्ये तात्पुरत्या कच्च्या, पक्क्या स्वरूपाचे पत्राशेड टाकून तर काही ठिकाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये तसेच निवासी मिळकतींच्या वापरात बदल करून हॉटेल्स सुरू करण्यात आले आहेत. हॉटेल्ससाठी पार्किंगबाबतही पूर्तता करण्यात आली नसल्याने रस्त्यावर वाहने लावली जात असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होत आहे. तर मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकांचा वापर होत असल्याने ध्वनी प्रदूषण होत आहे. त्यामुळे अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.