पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक धनिकांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर गावातील ग्रामस्थांनी यंदाचा मुंजोबा देवाचा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा संकल्प केला असून त्यातून उभी राहणारी रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. गावात गेल्या काही वर्षांपासून राजकीयदृष्टय़ा दोन गट पडले आहेत, त्यांच्यातून विस्तवही जात नाही. मात्र, दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची कळकळ दोन्हींकडून तितक्याच तीव्रतेने व्यक्त झाली असून एका गटाने चारा व पाण्याचे टँकर देण्याचा तर दुसऱ्या गटाने शासनाला रोख निधी देण्याची घोषणा केली आहे.
पिंपळे सौदागरचा मुंजोबाचा उत्सव यंदा १२ मे ला येत आहे. आतापर्यंतची परंपरा पाहता गावात मोठय़ा प्रमाणात धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जात होते. याशिवाय, बैलगाडा शर्यती, कुस्त्यांचा आखाडा, मिरवणुका आदींचे आयोजन करण्यात येत होते. यंदा मात्र, तसे काहीही न करता राज्यातील दुष्काळी बांधवांना मदतीचा हात देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यासाठी गावच्या दोन वेगवेगळ्या ग्रामसभा झाल्या.
मुंजोबा मंदिरात माजी नगरसेवक नाना काटे व पिंपरी पालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत यंदाचा उत्सव साध्या पध्दतीने पानफुलाचा कार्यक्रमाने साजरा करण्याचा निर्णय झाला. केवळ  ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढण्याचे ठरवण्यात आले. दरवर्षी उत्सवासाठी आयोजित करण्यात येणारा तमाशा, मिरवणूक, आखाडा तसेच मंडपाचा खर्च कमी करून त्यात आणखी पैशांची भर घालून दुष्काळनिधी उभारण्यात येणार आहे. ही रक्कम साधारणपणे १० ते १२ लाख रुपयांपर्यंत असेल, असा विश्वासही ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला.
दुसरीकडे, नगरसेवक शत्रुघ्न काटे व भगवान काटे यांच्या उपस्थितीत आईमाता मंदिरातही ग्रामसभा झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून फक्त पानफुल वाहून साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा तसेच जमा होणाऱ्या उत्सव निधीतून जनावरांना चारा व पाण्याचे टँकर दुष्काळी भागामध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची घोषणा शुक्रवारी करण्यात आली, तेव्हा नागरिकांकडूनही त्याचे स्वागतच करण्यात आले.