लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पुणे शहराचे महापौरपद भूषवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी कामाचा सपाटा सुरू केला आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना मोहोळ यांनी महाराष्ट्रामधील काही शहरातून विमानांची उड्डाणे सुरू केली आहे.

केंद्रात राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर मोहोळ यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करून ते प्रवाशांसाठी सुरू केले होते. आता याच विमानतळाच्या नावासाठी मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची भेट घेतली. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे’ नाव देण्यात यावे अशी मागणी मोहोळ यांनी या नेत्यांकडे केली आहे. मोहोळ यांनी केलेल्या मागणीमुळे या विमानतळासाठी आणखी काही नवीन नावांची मागणी देखील समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा-पिस्तुलाच्या धाकाने तरुणाची लूट, येरवडा पोलिसांकडून तिघे अटकेत

पुण्याचं विमानतळ असलेलं लोहगाव हे जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होतं. यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही देखील हीच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला संत तुकोबारायांचं नाव देणं, हे अधिक समर्पक असणार आहे, असे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा, यासाठी मोहोळ यांनी या नेत्यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे ते म्हणाले.

आणखी वाचा-कृषीच्या २५८ जागांच्या मागणीपत्राची एमपीएससीकडून परतपाठवणी

विमानतळाचे नामकरण करताना त्याच्या नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो. त्यानंतर या नावावर शिक्कामोर्तब होतं, म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली असल्याचे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muralidhar mohol demanded pune international airport be named as jagadguru santshrestha tukaram maharaj pune print news ccm 82 mrj