पुणे : केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीतील गुंडांनी मारहाण केल्यानंतर त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मोहोळ थेट नागरिकांच्या भेटी घेत आहेत. ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’च्या पाचव्या टप्प्याअंतर्गत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पर्वती मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क साधला. वैयक्तिक कामे, नागरी समस्या, सार्वजनिक आणि नव्या कल्पनांसह सहाशेहून अधिक नागरिक थेट केंद्रीय मंत्री मोहोळ यांना भेटले. राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ याही या उपक्रमात सहभागी झाल्या.

नागरिकांचे प्रश्न समजून घेता यावेत आणि ते वेळेत सुटावेत यासाठी खासदार मोहोळ यांनी खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कोथरूड विधानसभा मतदारसंघातून सुरू केला. त्यानंतर कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातही हा उपक्रम राबविण्यात आला. पर्वती विधानसभा मतदारसंघात झालेला हा पाचवा टप्पा होता.

नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासह सरकारच्या विविध योजनांचे स्टॅाल्स, आधार कार्ड संदर्भातील स्टॅाल्सही यावेळी उपलब्ध करुन देण्यात आले. ‘पर्वतीच्या अभियानात ६०० पेक्षा अधिक नागरिकांनी टोकन घेऊन भेट घेतली. वैयक्तिक कामे आणि नागरी प्रश्न सांगण्यावर नागरिकांचा कल होता. जे विषय लगेचच सुटू शकतील अशा कामांसंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच, दीर्घकालीन कामांसंदर्भातही अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम आखण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्याचे,’ मोहोळ यांनी सांगितले.

Story img Loader