पुणे : राज्यातील ३३ विमानतळांवर मुलभूत सुविधांचा अभाव असल्याची कबुली केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मात्र, या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर नुकतीच बैठक पार पडली असून, टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लागतील, असेही त्यांनी सांगितले.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये ‘डिजियात्रा’ सुविधेचा प्रारंभ शनिवारी मोहोळ यांच्या हस्ते झाला. त्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाध साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील ३३ विमानतळ असे आहेत, ज्या विमानतळांवर मुलभूत सुविधा अद्याप नाहीत. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत नागरी हवाई सुविधा वाढविण्यात येत असल्याने विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे रखडली आहेत. विस्तारीकरणासाठी भूसंपादन होणे आवश्यक असून, अनेक विमानतळांवर विमानांची वाहतूक होत नसल्याचे समोर आले आहे. विमाने उतरविण्यासाठी जागा, सुरक्षा आदी सुविधांची आवश्यकता आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांच्याबरोबर नुकतीच बैठक झाली. त्यावर तातडीने मार्ग काढण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.’
‘लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाबाबतही चर्चा करण्यात आली असून, पुढील ५० वर्षांच्या दृष्टिकोनातून विस्तार करण्यात येणार आहे. धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची, संरक्षण विभागाची आणि खासगी जागा किती आहे, याबाबतचे सर्वेक्षण झाले आहे. त्यानुसार दोनशे ते अडीचशे एकर जागा अपेक्षित आहे. हा भूसंपादन प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेगाने कार्यवाही सुरू आहे. लवकरच प्रादेशिक, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढविण्यात येतील,’ असेही मोहोळ यांनी सांगितले.