दोन वर्षांपूर्वी मारहाण केल्याचा राग मनात धरून एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून करण्यात आला. सहकारनगर मधील पद्मावती येथे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
तेजस सुनील पालवे (वय १९, रा. शंकरमहाराज झोपडपट्टी, सातारा रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चेतन मिसाळ  (रा. तळजाई वसाहत, पद्मावती) व त्याच्या तीन मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी आरोपी मिसाळ याने तेजसच्या बहिणीची छेड काढली होती. त्या वेळी तेजसने मिसाळला मारहाण केली होती. याचा राग मिसाळच्या मनात होता. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास तेजस हा सहकारनगर येथील जय मल्हार सोसायटी समोरून पायी जात असताना आरोपींनी त्याला एकटे गाठले. या ठिकाणी त्याच्याशी भांडण करून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्याच बरोबर काचेची फुटलेली बाटली पोटात खुपसली. यामध्ये तेजस हा गंभीर जखमी झाला. त्याला त्या ठिकाणीच सोडून आरोपी पळून गेले. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली. तेजसला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेजस हा टेम्पो चालविण्याचे काम करत होता. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले हे अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा