बारामतीमधील वडगाव निंबाळकर परिसरातून दहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधातून पत्नीने साथीदारांशी संगनमत करुन पतीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.वैभव विठ्ठल यादव (वय ३१, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी यादव याची पत्नी वृषाली (वय २३), तिचा प्रियकर रोहित दत्तात्रय खोमणे (दोघे रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, जि. पुणे), साथीदार सागर सर्जेराव चव्हाण (वय २७) शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सूर्यवंशी (वय २३, रा. वडगाव तुकाई माता चौक, ता. बारामती, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. वैभव यादव १९ फेब्रुवारी रोजी घरातून बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी वृषालीने वालचंदनगर पोलीस ठाण्यात दिली होती.
हेही वाचा >>>रुपी अवसायनात ; अवसायक म्हणून धनंजय डोईफोडे यांची नियुक्ती
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास करण्यात येत होता. वृषालीचे आरोपी रोहित खोमणे याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन वृषाली, रोहित आणि साथीदारांना पकडले. चौकशीत अनैतिक संबंधातून वैभवचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. पोलीस अधीक्षक अंकित गाेयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, शिवाजी ननावरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ आदींनी ही कारवाई केली.