डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासाठी फार काळ थांबता येणार नाही. पोलिसांना काही दिवसांचीच मुदत देणार असून तपास लागला नाही तर प्रश्न प्रतिष्ठेचा न करता गुन्ह्य़ाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचे सूतोवाच राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी केले. त्यासाठी सीबीआयशी बोलून त्यांना लागेल ती राज्य सरकारकडून मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला पाच महिने होत आले तरी आरोपींचा माग लागलेला नाही. याबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मुंबईतील प्रीती राठी हल्ला प्रकरणी आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्य़ातही अनेक दिवसांपासून आरोपींचा माग सुरु होता, पण आरोपी सापडत नव्हते. अखेर त्यांना आज अटक करण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणीही पोलीस स्वस्थ बसलेले नाहीत. या गुन्ह्य़ाचा तपास लवकर लागावा, असे जनमत आहे. मात्र, आता आम्हालाही फार काळ थांबता येणार नाही. आता पोलिसांना काही दिवसांचीच मुदत देणार आहे. हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता आवश्यकता पडल्यास सीबीआयशी बोलणी केली जाईल. त्यांना राज्य सरकारकडून हवी ती मदत दिली जाईल. सतीश शेट्टी प्रकरणी सीबीआयने काही पोलिसांची नावे घेतली आहेत. त्याबाबत पाटील यांनी सांगितले की, तपासात अडथळा आणणाऱ्या आणि दोषी पोलिसांची नावे सीबीआयने आम्हाला दिली तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल.
लोकसभेचे उमेदवार पवारच ठरवतील
लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातून तुमचे नाव घेतले जात असल्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले की, आमचे नेते पवारसाहेब हेच लोकसभेला कोण उभे राहील यावर शिक्कामोर्तब करतील. त्यांनी सांगितल्यानंतर ती व्यक्ती निवडणुकीला उभी राहील, असे पाटील म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा