लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मंगळवार पेठेत दोन महिन्यांपूर्वी एकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर फरासखाना पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृताची ओळख पटलेली नव्हती. गु्न्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात आलेल्या तपासात दारु प्यायल्यानंतर शिवीगाळ केल्याने अनोळखी व्यक्तीला मारहाण करुन त्याचा खून केल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
सिद्धार्थ अनिल बनसोडे (वय २२, रा. मंगळवार पेठ, जुना बाजार), शशी सुरेश चारण (वय २९, श्रमिक नगर, मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. २८ डिसेंबर २०२२ रोजी मंगळवार पेठ परिसरात एक मृतदेह आढळून आला होता. तपासात मृताच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नव्हता तसेच काही ओळखपत्र न मिळाल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू अकस्मात नसून दोघांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस कर्मचारी गजानन सोनूने यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावून मंगळवार पेठेतील श्रमिक नगर परिसरातून बनसोडे आणि चारण यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आणखी वाचा- पुणे : महिन्याभराचा संसार, एका दिवसात घटस्फोट
बनसोडे, चारण दोन मित्रांसह मंगळवार पेठेत दारू प्यायल्यानंतर गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ केल्याने बनसोडे आणि चारण यांनी त्याला लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. त्याच्या छातीत लाथ मारल्यामुळे त्यांचा जागीत मृत्यू झाल्याचे समजताच बनसोडे, चारण तेथून पसार झाले.
आणखी वाचा- VIDEO: चौकशीच्या निमित्ताने चोर जवळ आला, गळ्यातील दागिणे ओढले, अन् १० वर्षाच्या मुलीने…”
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, गजानन सोनुने, विनोद चव्हाण, संजय जाधव, साधना ताम्हाणे, उत्तम तारु आदींनी ही कारवाई केली.