सहा महिन्यांच्या मुलीला मंदिरात सोडले
गुजरातमध्ये बडोदा येथे पुणे पोलिसांच्या पथकावर गोळीबार करणारा गजा मारणे टोळीतील गुंड सागर रजपूतने त्याच्या प्रेयसीचा खून केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. रजपूतने प्रेयसीचा धुळ्याजवळ खून केल्यानंतर तिच्या सहा महिन्यांच्या मुलीला इंदूर-अहमदाबाद रस्त्यावर असलेल्या एका गावातील मंदिरातील पायरीवर सोडले.
सरोज हनुमंत चोपडे (वय २३, रा. राजविलास हाइट्स, बावधन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सागर रजपूतने पुण्यात टोळीयुद्धातून पप्पू गावडे आणि अमोल बधे यांचे खून केले होते.
खून केल्यानंतर तो पुण्यातून पसार झाला होता. त्याचे सरोजशी प्रेमसंबंध होते. गेल्या वर्षी तो ऑक्टोबर महिन्यात पुण्यात आला होता. १५ ऑक्टोबर रोजी तो सरोज आणि तिच्या सहा महिन्यांच्या मुलीला मोटारीतून घेऊन निघाला. रजपूतने बडोद्यात व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्याकडे पैसे असल्याची माहिती सरोजला होती.
त्यामुळे प्रवासात तिने रजपूतकडे सदनिका घेण्याचा आग्रह धरला होता. या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. जळगावपासून काही अंतरावर त्याने मोटारीत सरोजचा ओढणीने गळा आवळून खून केला. तिचा गळा सुरीने चिरला.
ओळख पटू नये म्हणून सरोजच्या डोक्यात दगड घातला. रस्त्याच्या कडेला तिचा मृतदेह टाकून तो पसार झाला. त्यानंतर सरोजच्या सहा महिन्याच्या मुलीला इंदूर-अहमदाबाद रस्त्यावर असलेल्या सरदारपुरा गावातील नवग्रह शनी मंदिराच्या पायरीवर सोडून तो पसार झाला, अशी माहिती पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील यांनी दिली.
पोलीस निरीक्षक बशीर मुजावर, पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, सहायक निरीक्षक संपत पवार, महादेव वाघमोडे, गणेश पाटील, उपनिरीक्षक पोपटराव गायकवाड यांनी ही कारवाई केली.