भीमा नदीत एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर या लोकांनी आत्महत्या केली की हत्या झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले गेले. अखेर पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात या आत्महत्या नसून हत्या असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पीडितांच्या नातेवाईकांनी करणी-काळ्या जादुच्या संशयातून हत्या केल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे चुलत भावानेच मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबाला संपवलं. या प्रकरणी पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे.
यात मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), जावई शाम पंडित फलवरे (वय २८), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४ वर्षे), नातू रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५) आणि कृष्णा शाम फलवरे (वय ३, सर्वजण रा. हातोला, ता. वाशी, जि. धाराशिव) याचा मृत्यू झाला.
भीमा नदीत मृतदेह आढळलेल्या सातजणांची सामूहिक हत्या ‘या’ कारणामुळे? शवविच्छेदन अहवालात वास्तव समोर
नेमकं काय घडलं?
मृतांपैकी एक असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार तीन महिन्यांपूर्वी चुलत भाऊ धनंजय पवारबरोबर त्याची सासरवाडी पेरणे फाटा येथे गेला होता. तिथून पुन्हा घरी येताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात धनंजय पवारचा मृत्यू झाला, तर अमोल पवार बचावला. यावरून धनंजयच्या कुटुंबाला धनंजयची हत्या झाल्याचा संशय आला.
मोहन पवार यांच्या कुटुंबाने मिळून धनंजयवर करणी, काळी जादू केली आणि त्याची हत्या केली, असा संशय धनंजयच्या घरच्यांना होता. या संशयातूनच धनंजयच्या घरच्यांनी मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबाला भीमा नदीवर अडवलं आणि तीन लहानग्यांसह सातजणांना नदीत फेकून दिलं. यात सातही जणांचा मृत्यू झाला.