दारू प्याल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी एकाचा गळा चिरून खून केल्याची घटना मंगळवारी (२४ मे) पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर घडली. या प्रकरणी दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी प्रभातकुमार कमलाकर म्हस्के (वय ३६, रा. सोलापूर) आणि निलेश बाळासाहेब भोसले (वय २५ रा, वेल्हे) यांना अटक करण्यात आली आहे. संजय (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे पूर्ण नाव आणि पत्ता पोलिसांना समजू शकला नाही. म्हस्के, भोसले, संजय मजुरी करतात. तिघे फिरस्ते असून त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे.

म्हस्केला एका केटरिंग व्यावसायिकाकडे काम मिळाले होते. त्याला कामाचे सोळाशे रुपये मिळाले होते. त्यानंतर म्हस्के, भोसले, संजय यांनी रात्री एकत्र दारू प्याली. त्यानंतर म्हस्के आणि संजय यांच्यात वाद झाला. म्हस्के आणि भोसले यांनी संजयचा गळा चाकुने चिरला आणि दोघे जण पसार झाले.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जोरे, सुशील लोणकर, संतोष काळे, निलेश साबळे आदींनी तपास करून पसार आरोपींना पकडले.

Story img Loader