पत्नीला अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या चुलत मेहुण्याचा खून केल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांना अटक केली.तुषार दिलीप मेटकरी (वय ३३, रा. केशवनगर, मुंढवा), विनोद विष्णू दुपारगुडे (वय ३४ ,रा. वडगाव धायरी,) किरण अंकुश चौधरी (वय ४३, रा.नांदेड फाटा) आशा तुषार मेटकरी (वय ३२, रा. केशवनगर मुंढवा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महादेव गणपती दुपारगुडे असे खून झालेल्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दरीपुलाजवळ महादेव दुपारगुडे मृतावस्थेत सापडला होता. दुपारगुडेची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे पोेलिसांनी समाजमाध्यमावर दुपारगुडेचे छायाचित्र प्रसारित केले होते. त्यानंतर दुपारगुडेचा भाऊ विजय पोलीस ठाण्यात गेला. मृतावस्थेत सापडलेला महादेव दुपारगुडे भाऊ असल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा – शाळेत गोंधळ; शिक्षकांना शिवीगाळ; सात जणांच्या विरोधात गुन्हा; येरवड्यातील घटना
महादेव आरोपी आशाला अश्लील संदेश पाठवून तिला त्रास देत होता. त्यामुळे आरोपींनी त्याला शुक्रवारी (१९ ऑगस्ट) धायरी भागात बोलावून घेतले. त्याला बेदम मारहाण करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह रिक्षातून दरी पूल परिसरात नेण्यात आला. मृतदेह झुडपात टाकून आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी तपास करुन आरोपींना पकडले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा – रोजगार मेळाव्यांतून सहा महिन्यांत ८५० जणांना रोजगार
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक नितीन शिंदे, धीरज गुप्ता, गौरव देव, अंकुश कर्चे, आशिष गायकवाड, मितेश चोरमले, अभिनय चौधरी, रवींद्र चिप्पा आदींनी तपास करुन आरोपींना ताब्यात घेतले.