पिंपरीः हवेत गोळीबार करत भर चौकात कोयत्याने वार करून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याची घटना चिंचवडला घडली आहे. या प्रकरणी १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्य आणि र्वॉशिंग सेंटरच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विशाल नागू गायकवाड (वय- ३८, मोरे वस्ती, चिखली) असे मयताचे नाव आहे. त्याच्या खूनप्रकरणात विशाल कांबळे, राजू कांबळे, सिध्द्या कांबळे, मिलींद कांबळे, विशाल लष्करे, करण उर्फ ससा, चैतन्य जावीर, ओमकार शिंदे, यश कुसाळकर, रोहित मांजरेकर, सूरज मोहिते, निलेश लष्करे, बालाजी कोकाटे, मोहन विचटकर यांच्यासह तीन अनोळखी व एक अल्पवयीन आरोपी असे मिळून १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुतांश आरोपी चिंचवड परिसरातील आहेत.

हेही वाचा: प्रेमप्रकरणाच्या संशयातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण, मारहाणीत युवक गंभीर जखमी; दोघे अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गायकवाडचा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता. आरोपींचे आणि विशालचे जुने भांडण असून व्यवसायावरूनही वाद आहेत. शुक्रवारी रात्री चिंचवडच्या परशुराम चौकात विशाल थांबला होता. तेव्हा आरोपींनी हवेत गोळ्या झाडून दहशत निर्माण केली आणि कोयत्याने वार करून विशालचा खून केला. त्यानंतर, आरोपी दुचाकीवरून पसार झाले. आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. चिंचवडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ पुढील तपास करत आहेत.