लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा महिलेने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची घटना कात्रज भागात घडली. पतीने आत्महत्या केल्याचा बनाव महिलेने रचला. तपासात महिलेने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली.

गोपीनाथ बाळू इंगुळकर (वय ३७, रा. सच्चाई माता मंदिराजवळ, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी राणी गोपीनाथ इंगुळकर (वय ३२), नितीन शंकर ठाकर (वय ४५, रा. कुरण, ता. वेल्हा, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली. गोपीनाथ मार्केट यार्डात हमाली काम करतात. त्यांची पत्नी राणी एका वसतीगृहात सफाईचे काम करते. आरोपी ठाकर त्यांच्या नातेवाईक आहे. राणी आणि ठाकर यांच्यात अनैतिक संबंध होते. गोपीनाथ मार्केट यार्डात हमाली काम करत असल्याने त्यांना पाठदुखीचा त्रास जाणवत होता. रविवारी (२२ सप्टेंबर) गोपीनाथ गाढ झोपेत होते. राणी आणि तिचा प्रियकर ठाकर यांनी गोपीनाथ यांचा गळा आवळून खून केला.

आणखी वाचा-ज्येष्ठाला मोहजालात अडकावून खंडणी प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ

त्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पोलिसांना या घटनेची माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली. गोपीनाथ यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात गोपीनाथ यांचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे, उपनिरीक्षक नितीन मोकाशी, हवालदार नामदेव रेणुसे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासात राणीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.

मुलीसमोर खून

गोपीनाथ आणि राणी यांना दहा वर्षांची मुलगी आहे. राणीने तिचा प्रियकर ठाकर याच्या मदतीने पती गोपीनाथचा गळा दाबून रविवारी मध्यरात्री खून केला. आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचला. गोपीनाथ यांचा खून करताना दहा वर्षांची मुलगी घरात होती. मुलीसमोर दोघांनी खून केला. मुलीला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. चौकशीत खुनाला वाचा फुटली.

आणखी वाचा-पुणे जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणारी टोळी गजाआड, १७ गुन्हे उघड; १५ लाखांचा ऐवज जप्त

अनैतिक संबंधातून खुनाची दुसरी घटना

कर्वेनगर भागात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना नुकतीच घडली. महिलेने पतीला जेवणात झोपेच्या गोळ्या दिला. गुंगी आल्यानंतर प्रियकराने पतीवर १३ ते १४ वार करून त्याचा खून केला. ही घटना ताजी असताना कात्रज भागात अशाच प्रकारची घटना घडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of husband who is obstructing in immoral relationship pune print news rbk 25 mrj