पुणे हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची फुरसुंगी फाटा येथून दोन दिवसांपूर्वी सकाळी पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून चार जणांनी अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळच्या सुमारास आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. आमदारांच्या मामाची हत्या होऊन ३६ तास उलटून देखील आरोपींचा शोध लागत नव्हता. यामुळे सत्ताधारी पक्षावर टीका होऊ लागली होती. त्याच दरम्यान पुणे पोलिसांनी वाघोली येथून पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे या दोघांना ताब्यात घेतले. त्या आरोपींच्या चौकशीदरम्यान अन्य दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
हेही वाचा – ‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
या घटने प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, सतीश वाघ यांचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाल्याच्या घटनेनंतर राज्यातील अनेक भागात तपासासाठी पथके रवाना करण्यात आली होती. त्या दरम्यान जवळपास ४५० ठिकाणांचे सीसीटीव्ही तपासण्यात आले होते. या सर्व तपासादरम्यान काल सायंकाळच्या सुमारास सुरुवातीला दोन आरोपींना अटक करण्यात आली आणि नंतर दोन आरोपी असे एकूण चार आरोपी अटकेमध्ये आहे. या आरोपींच्या चौकशीमध्ये सतीश वाघ यांचा काही दिवसांपूर्वी शेजारी राहणार्या व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्यातून सतीश वाघ यांना मारण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. यामधून ही घटना घडल्याचे समोर आले असून आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.