पुण्यात सावत्र वडिलांनी तीन वर्षांच्या बालिकेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सावत्र वडिलांना अटक केली. मुस्कान पाटील (वय ३) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे.
या प्रकरणी आरोपी जितेंद्र उत्तम पाटील (वय ३३, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) याला अटक करण्यात आली. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा घटस्फोट झाला आहे. महिलेचा चार महिन्यांपूर्वी जितेंद्रशी विवाह झाला. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. या मुलीचा जन्म अनैतिक संबंधातून झाल्याचे म्हणत आरोपी जितेंद्रने पीडित मुलगी मुस्कानला मारहाण केली. तसेच तिचे डोके भिंतीवर आपटले.
हेही वाचा : पुण्यात पोपटाची पिले दाखविण्याचा बहाणा करत मित्राला ढकलले रेल्वे पुलावरून, जलपर्णीमुळे मुलगा बचावला
या घटनेत जखमी झालेल्या मुस्कानला रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आरोपी जितेंद्रने रुग्णालयात मुलगी पडल्याने जखमी झाल्याची बतावणी केली होती. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी जितेंद्रला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर तपास करत आहेत.