पुणे : मद्य पिऊन त्रास देणाऱ्या लहान भावाचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी मोठ्या भावास अटक केली.तेजस यशवंत भोसले (वय २५) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी आकाश यशवंत भोसले (वय २९,रा. टिळेकरनगर, कोंढवा) याला अटक केली आहे. सुनीता यशवंत भोसले (वय ५०) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेजसला मद्य पिण्याचे व्यसन आहे. तेजस आणि आकाश सख्खे भाऊ आहेत.
तेजस मद्य पिऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करत होता. आकाश हा वेगळा राहत होता. मद्य पिऊन घरी आलेल्या तेजसने रात्री शिवीगाळ केली. या घटनेची माहिती आई सुनीता हिने आकाशला दिली. आकाश घरी आला. आकाश आणि तेजस यांच्यात वाद झाले. आकाशने तेजसचा गळा दाबला. मद्याचा नशेत असलेला तेजस बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक हरिश शिळीमकर यांनी दिली.