पुणे : कात्रज भागात लूटमारीस विरोध करणाऱ्या पादचारी तरुणाला बांबूने बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव नागनाथ चेंडके (वय २३, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रदीप हिरालाल शिंदे (वय १९, रा. काका वस्ती, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. शिंदे याच्या चौदा वर्षीय अल्पवयीन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चेंडके मजुरी करतो. तो धनकवडीतील चैतन्यनगर परिसरातून निघाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी शिंदे आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराने चेंडकेला अडवले. त्याला धमकावून पैसे मागितले. चेंडकेने नकार दिल्यानंतर दोघांनी त्याला बांबूने बेदम मारहाण केली.
हेही वाचा – ‘एनडीए’त नोकरीच्या आमिषाने चौघांची २८ लाखांची फसवणूक
गंभीर जखमी झालेल्या चेंडकेचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी प्रदीप शिंदे याला अटक केली. शिंदे याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक तावडे तपास करत आहेत.