पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना जेरबंद केले आहे. ही घटना रविवारी घडली असून या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, आकाश उर्फ मकसुद विजय जाधव असं आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कानिफनाथ आणि आरोपी आकाश हे दोघे अगोदर शेजारीहोते. शेजारी राहत असताना त्या परिसरातील काही तरुणांनी आकाशला दोन वेळा बेदम मारहाण केली होती. मात्र, या मारहाणीमागे मयत कानिफनाथ आहे असा संशय आरोपी आकाशला होता. दरम्यान, मारहाणीनंतर आकाश तिथून कुटुंबासह इतर ठिकाणी राहण्यास गेला. परंतु, आपल्याला घर स्थलांतरीत करावं लागलं आणि मारहाण झाली हा घटनाक्रम त्याला शांत बसू देत नव्हता.
याच रागातून रविवारी दुपारच्या सुमारास कानिफनाथ हा रस्त्यावर एका तरुणाशी बोलत असताना आकाश गुपचूप आला आणि पिशवीत आणलेल्या कोयत्याने कानिफनाथवर वार केले. बेसावध असलेला कानिफनाथ हा सैरावैरा धावत सुटला त्याच्या पाठीमागे आकाश कोयता घेऊन धावत होता. आकाशने त्याला काही अंतरावर गाठले आणि पुन्हा वार केले. कानिफनाथचा मृत्यू होत नसल्याचे पाहून त्याने डोक्यात दगड घालून खून केला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीच्या शोधात पथके रवाना करण्यात आली. तेव्हाच, पोलीस कर्मचारी नरहरी नानेकर यांना आरोपी हा चिखली परिसरातील लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. खुनाच्या प्रकरणात अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचं उघड झाले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.