पुणे : मालमत्तेच्या वादातून पुतण्याने काकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना पाषाण गावातील कोकाटे आळीत शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी पुतण्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश जयसिंगराव तुपे (वय ५६, रा. विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण गाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शुभम महेंद्र तुपे (वय २८), रोहन सूर्यवंशी (वय २०), ओम बाळासाहेब निम्हण (वय २०, तिघे रा. पाषाण गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश तुपे यांचा मुलगा वरद (वय १९) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा महेश तुपे यांचा पुतण्या आहे. त्यांच्या मालमत्तेवरुन वाद सुरू होता. महेश आणि शुभमची आई यांचे एकत्र बँक खाते आहे. एकत्र बँक खात्यातील पैशांची मागणी शुभमने काका महेश यांच्याकडे केली होती. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता.

शुभमने मित्र रोहन, ओम यांना हाताशी धरुन काका महेश यांचा खून करण्याचा कट रचला. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास महेश पाषाण गावातील कोकाटे आळीतून दूध आणण्यासाठी निघाले होते. आरोपी शुभम, रोहन आणि ओम कोकाटे आळीतील गणपती मंदिराजवळ दबा धरून बसले होते. आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या महेश यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, चतु:शृंगी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अश्विनी ननावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Story img Loader