लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : येरवडा कारागृहात कात्रीने भोसकून कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी चार कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महेश महादेव चंदनशिवे (रा.चिखली) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत श्रीकृष्ण समदूर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी मूरे आणि गणेश हनुमंत मोटे यांच्याविरुद्ध रात्री उशीरा येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश चंदनशिवे याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. २०२१ मध्ये चंदनशिवे आणि आरोपी गणेश मोटे यांच्यात कारागृहात वाद झाला होता. वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली होती. चंदनशिवेला कारागृहातील सर्कल क्रमांक दोनमधील बराकीत ठेवण्यात आले होते. गुरुवारी (२८ डिसेंबर) दुपारी सव्वातीनच्या सुमारास चंदनशिवे याच्यावर आरोपी समदूर, माने, मुरे, मोटे यांनी त्यांच्यावर हल्ला करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा-ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा निर्णय लांबणीवर

आरोपींनी कारागृहात लपविलेल्या कात्रीने चंदनशिवे याला भोसकले. त्याच्या मानेवर वार केला. या घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी तेथे धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या चंदनशिवेला तातडीने कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली.

चंदनशिवे याच्या खून करणाऱ्या कैद्यांविरुद्ध खून, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पिंपरी आणि खेड न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयाने त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.