पुणे : उत्तरप्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या वादातून टोळक्याने तिघांवर चाकूने वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलामुद्दीन जमील अहमद (वय २१, सध्या रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा), अमीर आणि अबरार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शकील खान, कलीम खान यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कलामुद्दीन अहमदने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – जुन्नरमधील विविध कार्यकारी सोसासयटीचे संचालक किशोर तांबे यांचा खून; दोघे गजाआड
कलामुद्दीन आणि आरोपी मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत. दोन वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्यात वाद झाला होता. कलामुद्दीन, अमीर, अबरार कोंढव्यातील भैरवनाथ मंदिर परिसरातून रात्री निघाले होते. त्या वेळी आरोपींनी तिघांवर चाकूने वार केले. तिघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.